राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये विज्ञान आणि नाविन्यता उपक्रम केंद्रं सुरु होतील अशी घोषणा माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी आज विधीमंंडळाच्या दोन्ही सभागृहात केली. राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगामार्फत वर्ष २०१५पासून राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये विज्ञान आणि नाविन्यता उपक्रम केंद्रं सुरु आहेत. येत्या पाच वर्षांमध्ये इतरही जिल्ह्यांमध्ये अशी केंद्रं सुरु होतील. तसंच राज्यात अठ्ठावीस नवीन टेक्नॉलॉजी लॅब उघडणार असल्याचंही शेलार यांनी सांगितलं.
सध्या वारणानगर, प्रवरानगर, अमरावती, सातारा, बारामती, देवरुख अशा सहा ठिकाणी अशी केंद्रं सुरु आहेत. त्यातून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, वैज्ञानिक प्रयोग, रोबोटिक्स, थ्रीडी प्रिंटींग, कोडींग या क्षेत्रांचा परिचय करुन दिला जातो. शिक्षकांना प्रशिक्षण तसंच शैक्षणिक साधन सामग्री दिली जाते. या केंद्रांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नांदेड, अकोला आणि परभणी या जिल्ह्यात या केंद्रांच्या उभारणीचं काम प्रगतीपथावर आहे. विज्ञान तंत्रज्ञान केंद्रांचा उपक्रम हा नवीन शिक्षणधोरणात समाविष्ट असलेल्या अनुभवाधिष्ठित आणि प्रयोगाधारित शिक्षण तसंच वैज्ञानिक दृष्टीकोन या उद्दीष्टांशी सुसंगत आहे. जेष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना मानवंदना म्हणून त्यांचं नाव या विज्ञान तंत्रज्ञान केंद्रांना देणार असल्याचं शेलार यांनी यावेळी सांगितलं.