संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने नवी दिल्लीत संसद भवन इथं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.
ऑपरेशन सिंदूरबाबत संसदेत बोलण्यासाठी सरकार तयार असून भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी केल्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याबाबतही सरकार सभागृहात योग्य उत्तर देईल, असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
सर्वपक्षीय बैठकीत सर्व पक्षाच्या नेत्यांनी आपापल्या भूमिका तसंच अधिवेशनात मांडू इच्छिणाऱ्या मुद्द्यांची चर्चा केली असं ते म्हणाले. दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सहकार्य करण्याची विनंती विरोधी पक्षांना सरकारने केली आहे, सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांशी समन्वय साधून काम करावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अधिवेशनात नियम आणि परंपरेचं पालन करत सर्व विषयांवर चर्चा होईल, असं रिजिजू यांनी स्पष्ट केलं.
अधिवेशनात प्रधानमंत्र्यांनी संसदेत महत्त्वाच्या विषयांवर निवेदन द्यावं अशी मागणी काँग्रेसने या बैठकीत केल्याचं गौरव गोगोई यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. ऑपरेशन सिंदूर दरम्यान ५ विमानं पाडली गेल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. त्यावर आणि पहलगाममधल्या सुरक्षेतल्या त्रुटीवर बोलावं, अशी मागणी काँग्रेस आणि आरएसपीने सरकारला केली आहे. तसंच अहमदाबाद विमान दुर्घटना, दिल्लीच्या मद्रासी कँपमधे बुलडोझर इत्यादी बाबींवर सरकारने स्पष्टीरकण द्यावं असं खासदार संजय सिंह म्हणाले. तर बिजेडीचे खासदार सस्मित पात्रा यांनी ओदिशात कायदा सुव्यवस्था कोलमडल्याचा आरोप बैठकीत केला.
या बैठकीला केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेतले नेते जे पी नड्डा, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू, संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि डॉ एल मुरूगन उपस्थित होते. याशिवाय, काँग्रेसचे गौरव गोगोई, प्रमोद तिवारी, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव, द्रमुकचे तिरुची सिवा आणि टी आर बालु, आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.
संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार असून ते २१ ऑगस्टपर्यंत चालेल. या अधिवेशनात दोन्ही सभागृहांच्या २१ बैठका होतील. या अधिवेशनात जनविश्वास सुधारणा विधेयक २०२५, राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ सभागृहात चर्चेला येण्याची शक्यता आहे.