नीट परीक्षेबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं केंद्रीय शिक्षण मंत्र्यांकडून स्वागत

नीट परीक्षेबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वागत केलं असून, शेवटी सत्याचा विजय झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेला त्रुटीमुक्त संस्था बनवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, नीट घोटाळ्यात सहभागी असलेल्यांना सोडलं जाणार नाही, असंही प्रधान यांनी स्पष्ट केलं. एनटीएच्या संपूर्ण सुधारणेसाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून, समितीनं तज्ज्ञांची मतं जाणून घेतली आहेत आणि विविध पद्धतींचा अभ्यास केला आहे. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी भारतीय शिक्षण व्यवस्थेवर आरोप करून, देशातल्या जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असून अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही यावेळी प्रधान यांनी केला.