केंद्र सरकार शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी तसंच शेतीवरचा खर्च कमी करण्यासाठी सातत्याने काम करत असून शेतकऱ्यांच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. नवी दिल्लीत आज हरित क्रांतीचे प्रणेते डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन् यांच्या जन्म शताब्दीनिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. डॉ. स्वामिनाथन यांनी भारताला अन्नाच्या उत्पादनात स्वयंपूर्ण बनवण्यासाठीच्या चळवळीचं नेतृत्व केलं, असंही मोदी यावेळी म्हणाले.
स्वामिनाथन यांनी जैवविविधतेच्या पलिकडे जात जैव-आनंद या दूरदर्शी संकल्पनेची ओळख करून दिली. त्यांच्या कृषीविज्ञान क्षेत्रातल्या कार्याबद्दल त्यांचं कौतुक केलं जातं. ते केवळ संशोधक नव्हते, तर शेतकऱ्यांना नवे शेती तंत्र स्वीकारण्यासाठी प्रेरित करणारे मार्गदर्शक होते. अशा व्यक्तिमत्त्वाला भारतरत्नने सन्मानित करण्याची संधी आपल्या सरकारला मिळाली, अशा भावनाही मोदी यांनी व्यक्त केल्या.