केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आज राज्यात ठिकठिकाणी मॉक ड्रिल घेण्यात आलं. युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास कमीत कमी वेळेत अधिकाधिक नागरिकांपर्यंत मदत पोहोचवता यावी, तसंच नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःला सुरक्षित ठेवावं, यासाठी आज ही सराव प्रात्यक्षिकं करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सात ठिकाणी तर रत्नागिरी जिल्ह्यात पाच ठिकाणी ही प्रात्यक्षिकं झाली. रायगड जिल्ह्यात उरणमध्ये झालेल्या मॉक ड्रिलमध्ये विविध विभागांनी सहभाग नोंदवला. पुणे जिल्ह्यातही अतिसंवेदनशील ठिकाणी सर्व संबंधित यंत्रणांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं काम करत प्रात्यक्षिकं केली. मुंबईत राज्य सरकार, बृहन्मुंबई महानगरपालिका, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल इत्यादी यंत्रणा सहभागी झाल्या होत्या.
छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर झालेल्या रंगीत तालमीत नागरिकांसोबत आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यात आला. नाशिकमध्येही नागरिकांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले.