उद्यापासून भारतीय उत्पादनांवर २५ टक्के कर लागू करण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेची भारतानं गंभीर दखल घेतली आहे. राष्ट्रहिताच्या सुरक्षेसाठी सरकार आवश्यक त्या सर्व उपाययोजना सरकार करेल असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
भारत आणि अमेरिकेदरम्यान निष्पक्ष, संतुलित आणि परस्परहिताच्या द्विपक्षीय व्यापार कराराबाबत वाटाघाटी सुरू आहेत. मात्र सरकारनं सर्वोच्च प्राधान्य शेतकरी, उद्योजक तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या हिताला चालना देणं आणि त्यांच्या हिताचं रक्षण करणं याला दिल्याचं या निवेदनात म्हटलं आहे.
दरम्यान, अमेरिकेच्या या निर्णयाबाबत फिक्की या औद्योगिक संघटनेनं नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयाचा देशाच्या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो अशी प्रतिक्रिया फिक्कीचे अध्यक्ष हर्षवर्धन अगरवाल यांनी व्यक्त केली आहे