नारीशक्ती हा देशाच्या प्रगतीचा मुख्य आधार असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यात आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान आणि ८व्या राष्ट्रीय पोषण मासाचा प्रारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते.
हे दोन्ही उपक्रम आजपासून दोन ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहेत. याअंतर्गत सर्व महिलांनी मोफत वैद्यकीय तपासणीची सुविधा आणि औषधं मिळणार आहेत. मध्य प्रदेशात आदि सेवा पर्व आणि देशातल्या पहिल्या पीएम मित्र पार्कची पायाभरणीही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाली.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या विशेष राष्ट्रीय अभियानाला आज इंदूर इथं प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते सुरूवात झाली. मुंबईच्या यशवंतराव चव्हाण केंद्रातून केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमधून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमात दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. दोन ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या अभियानात सर्व महिला आणि बालकांनी सहभागी होण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.