राज्यातल्या विविध महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज आरक्षण सोडती जाहीर झाल्या.
परभणी महानगरपालिकेतल्या १६ प्रभागांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण- महिला तसंच सर्वसाधारण अशा प्रवर्गांचं आरक्षण निश्चित करण्यात आलं.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी आज सोडत जाहीर झाली. त्यात ११५ सदस्यांपैकी ५८ जागा महिलांसाठी तर इतर मागास प्रवर्गासाठी ३१, अनुसूचित जातीसाठी २२ आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी २ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत.
धुळे शहरातील राजर्षी शाहू महाराज नाट्य मंदिरात महापालिकेच्या १९ प्रभागातील आरक्षण सोडत काढण्यात आली. महापालिकेच्या १९ प्रभांगापैकी १८ आणि १९ हे दोन प्रभाग लोकसंख्येच्या प्रमाणानुसार तीन-तीन सदस्यांचे असून उर्वरित १७ प्रभाग हे ४-४ सदस्यांचे निश्चित करण्यात आले. धुळे पालिकेच्या १९ प्रभागांतील ७४ जागांपैकी ३७ जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्या अनुसुचित जमाती प्रवर्गातील आणि अनुसुचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी प्रत्येकी ३ जागा राखीव आहेत. तर मागास प्रवर्गातील महिलांसाठी १० जागा आरक्षित आहेत. अनुसुचित जमाती आणि अनुसुचित जाती प्रवर्गासाठी प्रत्येकी ५ जागा आरक्षित असून ओबीसी प्रवर्गासाठी महिलांसह एकूण १८ जागा आरक्षित ठेवल्या आहेत. उर्वरित जागा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी असतील.
सोलापूर महानगरपालिकेच्या २६ प्रभागासाठी आरक्षण सोडत आज हुतात्मा स्मृती मंदिर इथं काढण्यात आली. यात १०२ पैकी ५१ जागा वेगवेगळ्या जाती प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
जालना महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत आज जिल्हाधिकारी कार्यालयातल्या सभागृहात जाहीर झाल्या. यात १६ प्रभागातल्या एकूण ६४ नगरसेवक पदांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग आणि सर्वसाधारण वर्गांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आलं.
नांदेड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण आज जाहीर झाली. यात एकूण ८१ नगरसेवकापैकी ४१ महिला नगरसेवक राहणार आहेत. अनुसूचित जातीच्या एकूण १५ जागापैकी ८ जागा या महिलांसाठी, अनुसूचित जातीच्या दोन जागांपैकी एक जागा महिलेसाठी, मागास प्रवर्गासाठी २१ पैकी ११ महिला आणि खुल्या प्रवर्गातील ४३ पैकी २१ महिला सदस्यांसाठी आरक्षण काढण्यात आलं.
लातूर महानगरपालिकेच्या एकूण ७० जागांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आलं. यातील ३५ जागा महिलांसाठी आरक्षित ठेवल्या आहेत.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्रभाग आरक्षण सोडत आज जाहीर झाली. एकूण ६६ जागांपैकी ३३ जागा महिलांसाठी आरक्षित ठेवल्या आहेत.
नागपूर महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी आज जाहीर झालेल्या आरक्षण सोडती मध्ये एकूण १५१ जागांपैकी ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या आहेत. त्यामुळे यंदा महापालिकेत यंदा ७६ नगरसेविका आणि ७५ नगरसेवक असं प्रतिनिधित्व असेल. पालिकेचे एकूण ३८ प्रभाग असून त्यापैकी ३७ प्रभागांमध्ये प्रत्येकी चार सदस्य, तर ३८ क्रमांकाच्या प्रभागात तीन सदस्य असणार आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी वाशी इथल्या विष्णुदास भावे नाट्यगृहात आज आरक्षण निश्चिती आणि सोडत काढण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीकरिता चार सदस्यीय प्रभाग रचना निश्चित केली आहे. त्यानुसार १११ सदस्यसंख्येकरिता २८ प्रभाग असून त्यामधील २७ प्रभाग हे चार सदस्यीय आणि एक प्रभाग तीन सदस्यीय झाला आहे. महानगरपालिकेच्या एकूण १११ सदस्यांपैकी एकूण ५६ महिला सदस्य असतील आणि प्रत्येक प्रभागात किमान दोन महिला सदस्य संख्या लक्षात घेऊन हे आरक्षण काढलं आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत जाहीर झाले. त्यानुसार अनुसूचित जाती महिला- प्रवर्गासाठी ५, अनुसूचित जमाती महिला- प्रवर्गासाठी २ जागा, मागास प्रवर्ग- महिलांसाठी १८ जागा आणि सर्वसाधारण महिला- प्रर्वगातील ४१ जागांची सोडत काढण्यात आली. महापालिकेच्या एकूण १३१ पैकी, अनुसूचित जातींसाठी ९, अनुसूचित जमातींसाठी ३, मागासवर्ग प्रवर्गासाठी ३५ जागा आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी ८४ जागा आहेत. एकूण १३१ जागांपैकी महिलांसाठी ६६ जागा आरक्षित आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २०२५ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकसदस्यीय प्रभाग प्रद्धतीनुसार आरक्षण निश्चिती आणि सोडत आज वांद्रे इथल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या सभागृहात काढण्यात आली. एकूण २२७ जागांपैकी अनुसूचित जातीसाठी १५ जागा, अनुसूचित जमातींसाठी २ जागा तर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी ६१ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. एकूण २२७ जागांपैकी ११४ जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या असून त्यापैकी ८ जागा महिला अनुसूचित जातींसाठी, एक जागा अनुसूचित जमातींसाठी, ३१ जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलांसाठी तर ७४ जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवला आहे.