दावोसमध्ये झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीतून राज्यात ३७ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले आहेत. त्यातून ४० ते ४२ लाख रोजगारांची निर्मिती होईल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली.
दावोसमध्ये एकूण ५१ करार झाले असून, त्यापैकी साडे १६ लाख कोटी रुपयांचे करार उद्योग क्षेत्रातले आहेत. MMRDA अंतर्गत २४ करार झाले असून किंमत सुमारे साडे २९ लाख कोटी रुपये आहे अशी माहिती त्यांनी दिली.
दावोसमधून येणाऱ्या गुंतवणुकीपैकी सर्वाधिक २३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक मुंबई महानगर क्षेत्रात येणार आहे. त्यानंतर कोकणात ३ लाख कोटी रुपयांहून अधिक, नागपूरमध्ये सुमारे २ लाख कोटी, नाशिकमध्ये ३० हजार १०० कोटी, छत्रपती संभाजीनगरमध्ये १७ हजार ७०० कोटी, पुण्यात सव्वा ३ हजार कोटी आणि अमरावतीत १,००० कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित असल्याचं उद्योगमंत्री म्हणाले.
सिडको अंतर्गत १ लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेचे ६ करार झाल्याची माहिती त्यांनी दिली. या एकूण गुंतवणुकीपैकी सरासरी ८० टक्के थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.