आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाचं आयोजन मुंबईत करणार -आशीष शेलार

राज्य शासनातर्फे यावर्षीपासून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांनी आज वार्ताहर परिषदेत केली.  जे मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचत नाहीत असे चित्रपट या महोत्सवात दाखवण्यात येतील. प्रत्येक चित्रपटासोबत त्या चित्रपटाचा चमू उपस्थित असेल. या निमित्त काही विशेष परिसंवाद आणि  या विषयातल्या अभ्यासकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. या महोत्सवाच्या घोषणेसोबत या वार्ताहर परिषदेत साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकनं आणि तांत्रिक तसंच बालकलाकार विभागातले पुरस्कार जाहीर करण्यात आले. कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन, अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक, संगीत अशा विविध विभागांमध्ये हे पुरस्कार दिले जाणार आहेत.