भविष्यातल्या गरजा लक्षात घेऊन सरकारकडे धोरण, कायदे आणि पायाभूत सुविधांची मागणी करणाऱ्या, आपल्या अडचणी सरकारसमोर मांडणाऱ्या संस्था गरजेच्या असल्याचं मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरचं नूतनीकृत मुख्यालय आणि सहकारी औद्योगिक वसाहत राज्यस्तरीय परिषदेच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरच्या गेल्या १०० वर्षांच्या वाटचालीदरम्यान आजूबाजूची सगळी परिस्थिती अमूलाग्र बदलली असून त्या बदलांशी जुळवून घेण्याच्या आणि कालसुसंगत राहण्याच्या दृष्टीनं अशा संस्थांनी आत्मपरिक्षण करायची गरज आहे, असं ते म्हणाले.
राज्य सरकार आणि चेंबरने एकत्रितपणे आणि सहकार्याने काम करावं आणि राज्याला पुढे न्यावं, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. उद्योग आणि व्यापाराला गुंतवणूक करण्यासाठी अतिशय पोषक वातावरण राज्यात असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.