महाराष्ट्र सरकारच्या डिजिटल प्रशासनासाठी मायक्रोसॉफ्ट सहकार्य करणार

मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाउंडेशनचे  सहसंस्थापक बिल गेट्स यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात  सदिच्छा भेट घेतली. यावेळी आरोग्य, कृषी आणि पायाभूत सुविधांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत त्यांची सकारात्मक चर्चा झाली.

 

राज्य सरकारच्या अनेक कल्याणकारी  योजनांविषयी  मुख्यमंत्र्यांनी गेट्स यांना माहिती दिली. त्यामध्ये नवी मुंबई इथली इनोव्हेशन सिटी , मलेरियामुक्त महाराष्ट्र, लखपती दीदी तसेच लाडकी बहीण योजनेचा समावेश होता.  गेटस यांनी सर्व उपक्रमासाठी आर्थिक बाबीसोबत तांत्रिक मदतीत भागीदारी करण्याची ग्वाही दिली.

 

राज्यात विविध सामाजिक संस्था, शासकीय संस्था आणि खाजगी कंपन्यांच्या सहकार्याने गेट्स फौंडेशन शाश्वत ऊर्जेसाठी, तसंच  क्रिस्पर केस नाईन आणि दुग्ध उत्पादन वाढ योजनेत भागीदारी घेणार असून याचा शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचेही गेट्स यांनी सांगितले. महाराष्ट्रात मोठी क्षमता असून महाराष्ट्राचे विकासाचे मॉडेल जगभर नेण्यासाठी प्रयत्न करण्याची खात्री  गेट्स यांनी व्यक्त केली . 

 

या भेटीदरम्यान अनेकशासकीय अधिकारी आणि गेट्स फौंडेशनचे अधिकारी उपस्थित होते. भेटीच्या शेवटी बिल गेट्स यांनी फडणवीस यांना सियाटल भेटीसाठी आमंत्रण दिले.