डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा

राज्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे, तर काही ठिकाणी नदीनाल्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. राज्यातल्या १७ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सरासरीएवढा पाऊस पडला आहे आणि १२ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. काल सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची नोंद झाली. विदर्भात अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना काल सुट्टी जाहीर करण्यात आली होती. जळगाव जिल्ह्यात हतनुर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणाचे चार दरवाजे अर्धा मीटर उघडण्यात आले असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबई शहर आणि उपनगरात कालही पावसानं हजेरी लावली. राज्यात पावसामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांच्या मदतीसाठी पालघरसह विविध जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. राज्यात एक जून ते २१ जुलै दरम्यान सरासरी ४२४ पूर्णांक ५ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा आतापर्यंत ५३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, हवामान विभागानं आजही रत्नागिरी आणि सातारा जिल्हयासाठी अतिमुसळधार पावसाचा तर रायगड ,सिंधुदुर्ग, पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.