‘मराठी साहित्य संमेलनांवर खर्च करण्यापेक्षा जगभरातल्या वेगवेगळ्या भाषांमधलं दर्जेदार, तसंच नोबेलप्राप्त साहित्य लगेच मराठीत अनुवादित करण्यासाठी सरकारनं अनुदान द्यावं, अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी व्यक्त केली. मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळातर्फे आज रत्नागिरीत एकदिवसीय जिल्हा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. गवस बोलत होते. नवनिर्माण शिक्षण संस्थेत होणाऱ्या या संमेलनस्थळाला चरित्रकार धनंजय कीर यांचं नाव दिलं आहे.
आपल्या भाषेच्या गौरवासाठी होणारी संमेलनं सरकारच्या निधीतून नाही, तर लोकवर्गणीतून केली पाहिजेत. सरकारचा निधी जगभरातलं तंत्रज्ञान आपल्या भाषेत आणण्यासाठी खर्च व्हावा. तसंच सरकारनं मराठी शाळा सशक्त कराव्यात,’ असं मत गवस यांनी व्यक्त केलं.