मराठवाडा मुक्तिदिन आज साजरा होत आहे. प्रचंड जन आंदोलन आणि भारत सरकारच्या पोलीस कारवाईनंतर १९४८ मधे याच दिवशी निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन हा प्रदेश भारतीय संघराज्यात विलीन झाला. छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं.
गोदावरी खोऱ्यातली पाण्याची तूट दूर करून मराठवाड्यातल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचवण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. राज्याच्या विविध नद्यांमधलं वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवलं जाणार असून, या कामाला पुढच्या सहा महिन्यात प्रत्यक्ष प्रारंभ होणार असल्याचं ते म्हणाले
मराठवाड्यात उद्योग, पाणी पुरवठा, रस्ते बांधणी आदी क्षेत्रात होणाऱ्या विकासकामांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. त्यापूर्वी त्यांनी मुक्तीसंग्रामाचं प्रतीक असलेल्या हुतात्मा स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदिपान भुमरे, खासदार कल्याण काळे, राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी, यांच्यासह जिल्ह्यातले सर्व लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
बीड इथं पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. या स्वातंत्र्यलढ्यात प्राण अर्पण करणाऱ्या शूरवीरांचं योगदान अमूल्य असून, त्यांचं स्मरण हेच आपल्या देशभक्तीचं बळ आहे, असं त्यांनी नमूद केलं.
परभणी इथं पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची जाणीव ठेवून त्यांच्या प्रेरणेने जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपण वाटचाल करुया असं त्या म्हणाल्या.
जालना इथं पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते, हिंगोली इथं पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते, लातूर इथं पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे यांच्या हस्ते, धाराशिव इथं पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते, तर नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.
मराठवाड्यतल्या सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांमधे तसंच शाळा महाविद्यालयांमधे मुक्तिदिनानिमित्त ध्वजवंदनेचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.