जम्मू-काश्मीरमध्ये वैष्णोदेवी मंदिर मार्गावर कटरा परिसरात झालेल्या भूस्खलनात आत्तापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. याठिकाणी अजूनही मदत आणि बचावकार्य सुरू आहे.
जम्मूमध्ये २४ तासात ३८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या १०० हून अधिक वर्षांत २४ तासांत झालेला हा विक्रमी पाऊस आहे. दोडा जिल्ह्यातही पावसाशी निगडीत दुर्घटनांमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे.
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि परिस्थितीची माहिती घेतली. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज कटरा इथल्या रुग्णालयाला भेट दिली आणि या दुर्घटनेतल्या जखमींशी संवाद साधला.
या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा सिन्हा यांनी केली.
हिमाचल प्रदेशातही ३ दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसानं चंबा, कांग्रा आणि कुल्लू जिल्ह्यातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळल्यानं राज्यभरातले शेकडो रस्त्यांवरची वाहतूक बंद पडली आहे. पठाणकोट-चंबा राष्ट्रीय महामार्गही बंद पडल्यानं हजारो वाहनं या मार्गावर तसंच मणी महेश यात्रेच्या मार्गावर अडकून पडली आहे.