राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर आजही चर्चा सुरु राहिली. या चर्चेत परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी सांगितलं की, पहलगाम इथं दहशतवादी हल्ल्यात निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला. त्यावर केंद्रसरकारने पाकिस्तानविरोधात कठोर धोरण घेतलं आहे. दहशतवादाला पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सिंधू पाणीवाटप कराराला स्थगिती देण्यात आली. आणि पाकिस्तानातले दहशतवादी स्थळ उद्ध्वस्त करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं. १९४७ नंतर सातत्याने पाकिस्तान भारत विरोधी दहशतवादी कारवायांना पाठबळ देत आहे. याआधीच्या सरकारने मात्र पाकिस्तानशी केवळ चर्चा केली. आता सरकारनं उचललेली कठोर पावलं जगानं पाहिली आहेत, असं ते म्हणाले.
त्यापूर्वी विविध मुद्यांवरुन विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे आज राज्यसभेच्या कामकाजात व्यत्यय येत राहिला. उपाध्यक्ष हरिवंश यांनी ११ वाजता शून्य प्रहर पुकारण्याचा प्रयत्न केला. मात्र घोषणाबाजीमुळे तो चालवता आला नाही. बिहारमधलं मतदार याद्यांचं सखोल पुनरिक्षण आणि इतर मुद्यांवर मिळून १८ स्थगन प्रस्ताव आपल्याकडे आले आहेत, असं सांगून ते फेटाळले असल्याचं उपाध्यक्षांनी सांगितलं.