डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

येत्या चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील-एकनाथ शिंदे

पंढरपूर इथला सुधारित तीर्थक्षेत्र आराखडा लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात येतील असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सांगितलं. सदस्य हेमंत रासने यांनी यासंदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती. या आराखड्याअंतर्गत पंढरपुरातल्या सफाई कामगारांना ६०० चौरस फुटांची घरं देण्यात येणार असून, यासाठी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले जातील असंही पवार यांनी सांगितलं. राज्य उत्पादन शुल्क विभागात सध्या सुरु असणाऱ्या भरती प्रक्रियेत बदल करण्याबाबत विधी आणि न्याय विभागाचा अभिप्राय घेऊन निर्णय घेण्यात येईल, असं पवार यांनी सदनात सांगितलं. दुय्यम निरीक्षकांची पदोन्नतीद्वारे होणारी पुढील भरती शंभर टक्के जवानांमधून केली जाईल, असं ते म्हणाले.

 

मुंबईला तोडण्याचं नाही तर जगाशी जोडण्याचं काम सरकार करत आहे. आगामी काळात मुंबईचा जीडीपी दुप्पट होईल, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते आज विधानसभेत २९३ अंतर्गत झालेल्या चर्चेला उत्तर देत होते. मुंबईत गेल्या अडीच वर्षांत अनेक विकासकामं झाली असून पुढच्या काही वर्षांत मुंबई खड्डेमुक्त होईल असं उपमुख्यमंत्री म्हणाले.‌ रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. गिरणी कामगारांना चार पाच हजार घरं दिली आहेत. झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातही गिरणी कामगारांसाठी घरं ठेवावीत असा निर्णय सरकारने घेतला आहे. पात्र गिरणी कामगारांची नोंदणी केली आहे, असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ओबीसी आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यामुळे या निवडणुका आतापर्यंत झाल्या नाहीत. येत्या चार महिन्यांत या निवडणुका होतील असं शिंदे यांनी स्पष्ट केलं.

 

   उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उत्तरावर राइट टू रिप्लाय करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली. या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केलं.

 

    राज्यातील अनेक वरिष्ठ अधिकारी आणि नेते हनिट्रॅपमध्ये अडकले असून संवेदनशील, गोपनीय माहिती बाहेर गेली आहे. याबाबत सरकार गंभीर असून यावर कारवाई केली जाईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितलं. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. यावर या प्रकरणातली तक्रार मागे घेतल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी माध्यमांना सांगितल्याचा मुद्दा भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. त्यामुळे सरकार या प्रकरणी दिशाभूल करत आहे का असं जाधव म्हणाले. यावर सभागृहात गदारोळ झाला आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा