मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज आझाद मैदानात उपोषणाला सुरुवात केली. उपोषणाला सुरुवात करण्याआधी जरांगे पाटील यांनी आंदोलकांना संयम पाळण्याचं आवाहन केलं. आंदोलनामुळे मुंबईत प्रचंड गर्दी झाली असून काही आंदोलकांनी नवी मुंबईतील वाशी इथं जाऊन तिथं आंदोलन सुरू करावं, अशा सूचना जरांगे यांनी केल्या आहेत. दरम्यान, मराठा आंदोलनामुळे आझाद मैदानाच्या दिशेनं येणाऱ्या विविध मार्गांवर वाहतुक पोलिसांनी निर्बंध घातले आहेत.
मराठा आंदोलनामुळे मुंबई महापालिका परिसरातील सर्व रस्ते, पूर्व द्रुतगती महामार्ग, पूर्व मुक्त मार्गांवर वाहतुकीची कोंडी झाली आहे. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी पूर्व मुक्त मार्गांवर त्यांच्या गाड्या थांबवल्या होत्या. परंतु तिथून अनेकजण पायी आझाद मैदानात दाखल झाले. आंदोलकांनी छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या समोरील रस्त्यावर ठिय्या दिला असल्यान इथली वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली आहे. सुमारे तीन हजार गाड्यांचा ताफा मुंबईत दाखल झाला आहे. पाच हजार लोकांनाच आझाद मैदानात प्रवेश दिला जाणार असं पोलिसांनी आंदोलकांना सांगितलं होते.