२०२५ या सरत्या वर्षानं भारताला मोठा आत्मविश्वास दिला असून, आता देश २०२६ मध्ये नवी आशा आणि नव्या संकल्पांसह पुढे जाण्यासाठी सज्ज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आकाशवाणीवर ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधत होते. हा या कार्यक्रमाचा १२९ वा भाग होता. २०२५ या वर्षाने प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला लावणारे क्षण दिल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
सरत्या वर्षातलं ऑपरेशन सिंदूर प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचं प्रतीक बनलं असून, आजचा भारत आपल्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करत नाही, हे जगानं पाहिल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
क्रीडा क्षेत्रासाठी २०२५ हे वर्ष संस्मरणीय ठरल्याचं नमूद करून, प्रधानमंत्र्यांनी भारताच्या पुरुष क्रिकेट संघानं जिंकलेली आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धा, महिला क्रिकेट संघाचं पहिलंवहिलं विश्वजेतेपद, दृष्टीहीन महिला क्रिकेट संघानं जिंकलेली पहिली टी-२० विश्वचषक स्पर्धा या यशाचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
शुभांशु शुक्ला, हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय बनले, भारतात चित्यांची संख्या आता ३० पेक्षा अधिक झाली आहे, प्रयागराज महाकुंभचं आयोजन आणि अयोध्येत राम मंदिरावर ध्वजारोहण कार्यक्रमाने प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानानं दाटून आल्याचं ते म्हणाले.
देशातल्या युवा शक्तीमुळे जग भारताकडे मोठ्या आशेने पाहत आहे, विज्ञान क्षेत्रातली आपली कामगिरी, नाविन्यपूर्ण संशोधन, तंत्रज्ञानाचा विस्तार यामुळे जगभरातले देश खूप प्रभावित झाले असल्याचं ते म्हणाले. जगभरातली भारतीय युवा पिढी आपली संस्कृती आणि वारसा, याच्याशी घट्ट जोडलेली असावी, आपली संस्कृती आणि वारशाचं जतन संवर्धन करावं यासाठी करत असलेल्या प्रयत्नांची माहितीही प्रधानमंत्र्यांनी दिली. देशाच्या स्वातंत्र्यात योगदान देणाऱ्या अज्ञात व्यक्तीमत्वांबद्दल समजून घेण्यासाठी सरकारनं तयार केलेल्या विशेष संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन त्यांनी केलं.
आपल्या पारंपरिक कला या समाजाच्या सक्षमीकरणासह, लोकांच्या आर्थिक प्रगतीचं मोठं माध्यम बनल्याचं सांगून, त्यांनी याबाबत देशभरात सुरु असलेल्या विविध प्रयत्नांची माहिती दिली.
२०२५ मधला हा ‘मन की बात’ चा शेवटचा भाग असल्याचं नमूद करून, २०२६ हे वर्ष ‘विकसित भारत’ संकल्पाच्या पूर्ततेच्या प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा ठरो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.