डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

AI मध्ये युवकांचा वाढता सहभाग नव्या क्रांतीला जन्म देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

अंतराळ क्षेत्र तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातला भारतीय युवकांचा वाढता सहभाग नव्या क्रांतीला जन्म देत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आकाशवाणीवर ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज जनतेशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा ११९वा भाग होता. नवनवीन तंत्रज्ञान स्वीकारून त्याचा अवलंब करण्यात भारतातील लोक कोणापेक्षाही मागे नसल्याचं ते म्हणाले. 

 

गेल्याच महिन्यात इस्रोचं शंभरावं रॉकेट प्रक्षेपण झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.

 

 

इसरोच्या यशाचा परीघ खूपच मोठा असल्याचं सांगत इस्रोच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत गाठलेल्या यशाचा आढावा त्यांनी घेतला. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातही भारत वेगानं आपली ओळख प्रस्थापित करत असल्याचं ते म्हणाले. या क्षेत्राशी संदर्भात पॅरीस इथं झालेल्या परिषदेत भारताच्या प्रगतीचं जगानं कौतुक केल्याचा अनुभव त्यांनी श्रोत्यांना सांगितला. 

 

 

येत्या काही दिवसात आपण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणार असल्याचं स्मरण करून देताना त्यांनी मुलांना विज्ञानाची आवड असणं गरजेचं असल्याचं सांगितलं. यादृष्टीनं ‘वैज्ञानिक म्हणून एक दिवस’ ही कल्पना त्यांनी मांडली. नागरिकांनी आपल्या सोयीचा दिवस निवडून त्या दिवशी एक शास्त्रज्ञ, एक वैज्ञानिक म्हणून जगून पाहावं, संशोधन प्रयोगशाळा, तारांगणं किंवा अंतराळ संशोधन केंद्रांना भेट द्यावी, असं आवाहन त्यांनी केलं.

 

 

यंदाच्या महिला दिनानिमीत्त ८ मार्च रोजी, एका दिवसासाठी आपण आपल्या समाजमाध्यमांची खाती देशातल्या काही प्रेरणादायी महिलांकडे सोपवणार आहोत. या खात्यांवर त्या त्यांचं काम, त्यांच्या समोरची आव्हानं, अनुभव देशवासियांना सांगतील, असं ते म्हणाले. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी महिलांनी नमो ॲपवर तयार केलेल्या मंचाच्या माध्यमातून सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं. 

 

 

उत्तराखंडमध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतल्या यशवंतांचं त्यांनी अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी इतर पदक विजेत्यांसह महाराष्ट्रातल्या किरण म्हात्रे, तेजस शिरसे या खेळाडूंचा उल्लेख केला. एक तंदुरुस्त आणि निरोगी राष्ट्र बनण्यासाठी भारताला लठ्ठपणाच्या समस्येवरही मात करावी लागेल, असं प्रधानमंत्री म्हणाले. या अनुषंगानं आपल्या आहारातला खाद्य तेलाचा वापर दहा टक्क्यांनी कमी करण्याचं आवाहन त्यांनी श्रोत्यांना केलं. 

 

 

देशातली वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधता आणि आपल्या स्थानिक संस्कृतीमधलं त्याचं स्थान याबद्दलची माहिती प्रधानमंत्र्यांनी दिली. महाराष्ट्रात वाघोबाची पूजा करण्याची परंपरा असल्याचा उल्लेख त्यांनी केला. या जैवविविधतेच्या जतन संवर्धन आणि संरक्षणासाठी देशभरातला आदिवासी समाज करत असलेल्या प्रयत्नांचं त्यांनी कौतुक केलं. यामुळेच देशात वाघ, बिबटे, आशियाई सिंह, गेंडे आणि बारशिंगा अशा प्राण्यांची संख्या झपाट्यानं वाढू लागली असल्याचं ते म्हणाले.