डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 27, 2025 3:13 PM | Mann Ki Baat

printer

‘मन की बात’ मध्ये वैज्ञानिक प्रगतीपासून लोकपरंपरांपर्यंत विविध क्षेत्रांचं महत्त्व विशद

अंतराळ क्षेत्रातल्या देशाच्या प्रगतीमुळे लहान मुलांमध्ये विज्ञान विषयक जिज्ञासा वाढली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा १२४ वा भाग होता. अलिकडेच ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांची अंतराळवारी यशस्वी झाली, त्याचा  देशात आनंदोत्सव झाला याचा उल्लेख त्यांनी केला. यानिमित्तानं त्यांनी ऑगस्ट २०२३ मधल्या चांद्रयान ३ मोहिमेच्या यशाची आठवण करून दिली. या सफलतेनंतर लहान मुलांमध्ये इन्स्पायर-मानक या उपक्रमात सहभागी होणाऱ्या मुलांची संख्या दुप्पटीनं वाढली असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात अंतराळ विषयक स्टार्ट-अप्सची संख्या वेगानं वाढून २०० पेक्षा जास्त झाली असल्याचं ते म्हणाले. येत्या २३ ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय अंतराळ दिनासाठी आपल्या कल्पना, नमो अॅप वर पाठवण्याचं आवाहनही त्यांनी श्रोत्यांना केलं.

 

भारतीय विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र तसंच गणित ऑलिंपियाड मध्ये केलेल्या पदक विजेत्या कामगिरी बद्दल  त्यांनी आनंद व्यक्त केला. पुढच्या महिन्यात खगोलशास्त्र तसंच खगोलभौतिकशास्त्र ऑलिंपियाड मुंबईत होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

मराठा साम्राज्याच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोची मान्यता मिळाल्याचं त्यांनी अभिमानाने सांगितलं. या प्रत्येक किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व आणि वैशिष्ट्य, यातून  छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी दिसते असं ते म्हणाले. 

 

स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात ऑगस्ट महिन्यामधे झालेल्या  महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख त्यांनी केला. खुदीराम बोस यांच्या बलिदानाची आठवण त्यांनी करून दिली. १ ऑगस्टला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी, ८ ऑगस्टला गांधीजींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेलं भारत छोडो आंदोलन, ७ ऑगस्ट १९०५ ला सुरू झालेली स्वदेशी चळवळ आणि १५ ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन यांचा उल्लेख त्यांनी केला. देशाच्या फाळणीच्या वेदनांचं स्मरण करून देण्यासाठी १४ ऑगस्ट रोजी फाळणी वेदना स्मृती दिन पाळला जात असल्याचंही त्यांनी श्रोत्यांना सांगितलं.

 

येत्या ७ ऑगस्टला साजऱ्या होत आलेल्या राष्ट्रीय हातमाग दिनाला यंदा १० वर्ष पूर्ण होत असल्याची आठवणही त्यांनी श्रोत्यांना करून दिली. यानिमित्तानं त्यांनी महाराष्ट्रातल्या पैठण इथल्या कविता ढवळे यांनी सरकारनं केलेल्या सहाय्याच्या बळावर आपला व्यवसाय आणि उत्पन्न कसं वाढवलं याचं उदाहरण श्रोत्यांसमोर मांडलं.  याबद्दल कविता ढवळे यांनी आनंद व्यक्त केला. 

 

अशाच इतर यशोगाथाही त्यांनी श्रोत्यांना सांगितल्या. वस्त्रोद्योग आणि तयार कपड्यांची बाजारपेठ सातत्यानं वाढत असून, वस्त्रोद्योग हे विकसित आणि आत्मनिर्भर भारताचा सर्वात मोठा आधार आहे,असं प्रधानमंत्री म्हणाले.  सध्या देशभरात तीन हजारापेक्षा जास्त वस्त्रोद्योग स्टार्ट-अप्स सक्रिय असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

भजन -कीर्तनातून होणाऱ्या जनजागृतीबद्दलही त्यांनी श्रोत्यांना सांगितलं. आपल्या लोकपरंपरा केवळ इतिहास नव्हे तर समाजाला दिशा देण्याचं साधन आहे, असं त्यांनी सांगितलं.

 

वर्तमान आणि इतिहासाच्या दस्तऐवजीकरणाचं महत्त्वही सांगत प्रधानमंत्री म्हणाले, हस्तलिखितांच्या स्वरूपात शतकानुशतके जतन केलेलं ज्ञान ही आपली खरी ताकद आहे, त्यात विज्ञान आहे, वैद्यकीय उपचार पद्धती संगीत, तत्त्वज्ञान आणि मानवतेचे भविष्य उज्ज्वल बनवू शकणाऱ्या विचारांचा ठेवा आहे.

 

या असाधारण ज्ञानाचा वारसा जपणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचं ते म्हणाले, यादृष्टीनं देशभरात सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी श्रोत्यांना दिली. जैवविविधतेची ओळख होण्यासाठी पक्षी निरीक्षणासारख्या  छंदाना प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

 

माओवादी हिंसाचार संपुष्टात आणून त्यात गुंतलेल्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचे प्रयत्नही त्यांनी  मांडले.

 

जागतिक पोलिस आणि अग्निशमन स्पर्धेत भारतानं मिळवलेल्या घवघवीत यशाचा उल्लेख करून त्यांनी या सर्व खेळाडूंचं आणि प्रशिक्षक संघाचं अभिनंदन केलं. आता २०२९ मध्ये या स्पर्धा भारतात होणार असल्याची माहिती त्यांनी श्रोत्यांना दिली.

 

खेलो भारत निती २०२५ अंतर्गत खेळांशी संबंधित स्टार्टअप्सना सर्व प्रकारची मदत केली जाईल, असं ते म्हणाले. खेळ सांघिक भावना निर्माण करतात. खेळ हा तंदुरुस्ती, आत्मविश्वास आणि एक मजबूत भारत निर्माण करण्याचा मार्ग आहे, म्हणून भरपूर खेळा, असं आवाहन त्यांनी केलं.

 

स्वच्छ भारत मोहिमेला लवकरच ११ वर्षे पूर्ण होणार असल्याची आठवण त्यांनी करून दिली. दरवर्षी होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणामुळे या भावनेला आणखी पाठबळ मिळालं असल्याचं त्यांनी नमूद केलं. स्वच्छता हे एका दिवसाचं काम नाही, आपण वर्षातील प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी स्वच्छतेला प्राधान्य देऊ, तेव्हाच देश स्वच्छ राहील असा सल्लाही त्यानी श्रोत्यांना दिला.

 

हरियाली तीज, नागपंचमी, रक्षाबंधन, आणि जन्माष्टमी या सणांच्या शुभेच्छाही त्यांनी जनतेला दिल्या.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा