राज्याचे कृषिमंत्री आणि सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू शिवाजी कोकाटे यांना नाशिकमधल्या न्यायालयानं २ वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. याप्रकरणी न्यायालयांना दोघांनाही जामीन मंजूर केला आहे.
सुमारे २० वर्षांपूर्वी खोटी कागदपत्रे देऊन मुख्यमंत्री कोट्यातली सदनिका घेतली. अन्य दोन लाभार्थ्यांच्या सदनिकाही नावावर करुन घेतल्याची तक्रार माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी केला होता. त्याप्रकरणी ही शिक्षा झाली आहे. दिघोळे यांनी राजकीय वैमनस्यातून तक्रार दाखल केली हाेती. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात दाद मागणार असल्याचे कोकाटे माध्यमांशी बेालताना सांगितले.
याप्रकरणी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे. आता कोकाटेंवर गुन्हा सिद्ध होऊ द्या असं अजित पवार आता म्हणू शकणार नाहीत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या नावावर माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी भ्रष्टाचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. आता माणिकराव कोकाटे यांना न्यायालयानं दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. या दोघांना मंत्रीमंडळातून बरखास्त करावं,अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
कोकाटे या निकालाला आव्हान देणार आहेत. त्यामुळं त्याला स्थगिती मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी व्यक्त केला.