सदनिका घोटाळ्याप्रकरणी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दोषी ठरवल्याच्या पार्श्वभूमीवर आज त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला. कायदे, नियम हे कोणत्याही व्यक्तीपेक्षा महत्त्वाचे आहेत, त्यामुळे कोकाटे यांनी राजीनामा दिल्याचं अजित पवार यांनी समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे. हा राजीनामा पुढल्या प्रक्रियेसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्याचं पवार यांनी सांगितलं.
सार्वजनिक जीवनात नेहमीच संविधानिक नैतिकता, संस्थात्मक प्रामाणिकपणा जपावा तसंच न्यायव्यवस्थेचा आदर करावा, याच विचारांना अनुसरून आपल्या पक्षाची वाटचाल राहिली आहे असं पवार म्हणाले. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करण्याबद्दल आपण वचनबद्ध असून लोकशाही मूल्यं जपली जातील आणि जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही, या दृष्टीकोनातून कार्यरत राहू असंही पवार म्हणाले.