आरोग्य ते सामाजिक सुरक्षा अशा क्षेत्रात देशभरातील नागरिकांना विविध योजनांचे लाभ मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना अर्थात आयएलओने जाहीर केलेल्या अहवालात नमूद केल्याप्रमाणे भारतातील 64 टक्क्यांहून अधिक लोक कोणत्या ना कोणत्या सामाजिक संरक्षण योजनांचा लाभ घेत आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल सांगितलं. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या एकशे तेविसाव्या भागात ते काल बोलत होते. आणीबाणीच्या घटनेला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त, देशात संविधान हत्या दिवस पाळला गेला; त्याबाबत त्यांनी माहिती दिली. मोरारजी देसाई आणि अटलबिहारी वाजपेयी या माजी प्रधानमंत्र्यांनी आणीबाणीच्या निषेधात केलेल्या भाषणांचा अंशही त्यांनी ऐकवला.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशासह जगभरात झालेल्या विविध उपक्रमांचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. देशाच्या विविध भागात सध्या सुरू असलेल्या यात्रा, आणि या यात्रांमध्ये सहभागी होणारे भाविक म्हणजे एक भारत श्रेष्ठ भारत भावनेचं प्रतिबिंब असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. महाराष्ट्रातल्या छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातल्या पाटोदा ग्रामपंचायतीनं सामूहिक प्रयत्नातून स्वच्छतेबाबत केलेल्या उपाययोजनांची माहिती प्रधानमंत्र्यांनी दिली.
जागतिक आरोग्य संघटनेनं भारत हा ट्रॅकोमा या डोळ्यांच्या आजारापासून मुक्त झाल्याची घोषणा केली असल्याची माहिती मोदी यांनी दिली. आपलं सामर्थ्य वाढवण्यासाठी आरोग्याकडे लक्ष देण्याचं आवाहन त्यांनी केलं. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचलेले पहिले भारतीय ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्याशी झालेल्या संवादाविषयी देखील प्रधानमंत्र्यांनी श्रोत्यांना सांगितलं.