मनरेगा कायद्या ऐवजी ‘व्हीबी जी राम जी’ हा कायदा आणून केंद्र सरकारने गरीबांच्या पोटावर पाय दिला असल्याची टीका करत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ‘जी राम जी’ विरोधात आंदोलन उभारण्याचा इशारा दिला. नवी दिल्ली इथं आज काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली, त्यात ‘जी राम जी’ कायद्यासह इतर मुद्द्यांवर चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर खरगे यांनी हे विधान केलं आहे. मनरेगाने ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलला, हा जगातला सर्वात मोठा ग्रामीण रोजगार उपक्रम होता, दलित, आदिवासी, महिला आणि भूमीहीन नागरिकांना याचा मोठा आधार होता, असं खरगे म्हणाले. त्यामुळे मनरेगा रद्द करून कोट्यवधी गरीब जनतेला निराधार केल्याचा आरोप त्यांनी केला. कार्यकारिणीच्या बैठकीत बांगलादेशात हिंदू अल्पसंख्यकांवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध करण्यात आला. तसंच मतदारयाद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेबद्दल चर्चा झाली. मतदारांची नावं वगळली जाणार नाहीत याची काळजी काँग्रेस कार्यकर्त्यांनी घ्यावी असं आवाहनही खरगे यांनी केलं. या बैठकीला काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतले विरोधी पक्षनेेते राहुल गांधी उपस्थित होते.
Site Admin | December 27, 2025 3:38 PM | mallikarjun kharge
विकसित भारत जीरामजी कायद्याविरोधात आंदोलनाचा काँग्रेसचा इशारा