मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व सात आरोपींची आज विशेष एनआयए न्यायालयाने ठोस पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली. सुमारे १७ वर्षे चाललेल्या या प्रदीर्घ खटल्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला.
आरोपींमध्ये माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांचा समावेश आहे. सरकारी वकिलांनी कोणताही ठोस पुरावा सादर न केल्यामुळे सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करत असल्याचं विशेष न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी आपल्या निकालात नमूद केलं. २००८ मध्ये नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथं हा बॉम्बस्फोट झाला होता. त्यात सहा जणांचा मृत्यू झाला, तर १०० हून अधिक जण जखमी झाले होते. या प्रकरणाचा सुरुवातीचा तपास एटीएस अर्थात दहशतवाद विरोधी पथकानं केला होता. या प्रकरणी १२ जणांना अटक झाली होती. त्यानंतर हा तपास एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आला होता. या प्रकरणातला अंतिम युक्तिवाद एप्रिल २०२४ मध्ये संपला आणि न्यायालयानं १९ एप्रिल रोजी या खटल्याचा निकाल राखून ठेवला होता.
खटल्यातल्या १२ आरोपींपैकी ३ जणांची यापूर्वीच निर्दोष सुटका झाली होती. तर दोन आरोपींवर फक्त शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत खटला चालवला जाईल, असं न्यायालयानं आज स्पष्ट केलं.