बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ आज नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्वपक्षीयांच्यावतीनं काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चात हजारो नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं सहभागी होत आरोपीच्या फाशीच्या शिक्षेची मागणी केली. जमावानं घाेषणाबाजी करत न्यायालयात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला.
दरम्यान, राज्यात गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नसून महिला अत्याचाराचे प्रमाण वाढलेले आहे. मालेगाव प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.