प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मालदीव्जचे उपराष्ट्राध्यक्ष हुसैन मोहम्मद लतीफ यांची भेट घेऊन चर्चा केली. परराष्ट्रव्यवहारमंत्री डॉ. एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल तसंच परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री त्यांच्यासोबत होते.
प्रधानमंत्र्यांनी मालदीव्जचे माजी प्रधानमंत्री आणि माजी राष्ट्राध्यक्षांचीही भेट घेतली. मालदीव्जचा हीरकमहोत्सवी स्वातंत्र्यदिन आज साजरा होत असून, त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मालदीव्जच्या नागरिकांना त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनीही मालदीवच्या नागरिकांचं अभिनंदन केलं. भारत – मालदीव राजनैतिक संबंधांना यंदा ६० वर्षं पूर्ण होत असून भारत-प्रशांत महासागर क्षेत्रात शांतता, समृद्धी आणि स्थैर्य राखण्याच्या दृष्टीनं हे संबंध आणखी बळकट करायला भारत वचनबद्ध आहे, असंही जयशंकर म्हणाले.
मालदीव्जचे राष्ट्राध्यक्ष मुईत्झु यांनी मोदी यांच्या सन्मानार्थ काल विशेष समारंभाचं आयोजन केलं होतं. यावेळी उभय देशांदरम्यान विविध सामंजस्य करारही करण्यात आले. त्याविषयी आमच्या प्रतिनिधीनं माहिती दिली.
मालदीव्जचा दौरा आटोपून प्रधानमंत्री आज मायदेशी परतणार आहेत.