डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्यात मकरसंक्रांती सणाचा उत्साह

मकरसंक्रांतीचा सण आज राज्यात उत्साहाने साजरा होत आहे. तीळगूळ घ्या गोड बोला असं आवाहन करत संक्रांती निमित्त शुभेच्छांची देवाण घेवाण होत आहे. घरोघरी ताजे हरभरे, उसाचे करवे बोरं आणि सौभाग्यचिन्हांनी सजलेल्या मातीच्या सुगडांचं पूजन आज केलं जातं. याशिवाय दानधर्मही केला जातो. राज्यात ठिकठिकाणच्या मंदिरांमधे संक्रांतीनिमित्त देवदर्शनासाठी गर्दी झाली आहे. मंदिरांना सजावट करण्यात आली आहे. नाशिकमध्ये गोदावरी नदीत रामकुंडावर स्नानासाठी गर्दी झाली आहे.

 

ठिकठिकाणी पतंग उडवण्याचा खेळ रंगला आहे. घातक मांजाच्या वापरावर बंदी घालण्यात आली असून पोलीस आणि प्रशासनानं अनेक ठिकाणी कारवाई करुन नायलॉन मांजाचे साठे जप्त केले आहेत. नागपूर शहरात विवीध कारवाईत जप्त केलेला नायलॉन मांजा पोलीसांकडून नष्ट करण्यात आला. नागपुरातल्या जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत इंदोरा मैदानात रोड रोलर फिरवून जप्त केलेला नायलॉन मांजा नष्ट करण्यात आला. जवळपास 18 लाख किमतीचा नायलॉन मांजा पोलीसांकडून नष्ट करण्यात आला.

 

नाशिकमध्ये नायलॉन मांजाच्या विरोधात पोलिसांनी कडक भूमिका घेतली असून काल एका दिवसात २४ गुन्हे दाखल करण्यात आले. यात ३३ जण आरोपी असून ९ मुले अल्पवयीन असल्याने त्यांच्या पालकांविरूध्द सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आज संक्रांतीच्या दिवशी नाशिक पोलीस साध्या वेशात पायी गस्त घालत असून नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करून  गंभीर कारवाई करण्यात येत आहे.

 

शहरात पाथर्डी फाट्या जवळ दुचाकीवरुन जाणाऱ्या २२ वर्षाच्या युवकाचा नायलॉन मांजाने गळा कापला गेला, आणि त्याचा मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्यात लाखनी इथं उड्डाणपुलावरुन जाणाऱ्या तरुणाला नायलॉन मांजा गळ्यात अडकून गंभीर दुखापत झाली.  गळ्याला झालेल्या जखमेमुळं मोठा रक्तस्त्राव झाला. स्थानिकांनी त्याला ताबडतोब उपचारासाठी रुग्णालयात नेलं. २४ वर्ष वयाचा हा तरुण गोंदिया जिल्ह्यातल्या गोरेगावचा रहिवासी आहे.  

सर्वाधिक वाचले

सर्व पहा