इराणमधील आंदोलनाचा मोठा परिणाम हवाई वाहतुकीवर झाला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव तिथली इंटरनेट सेवा ठप्प आहे. परिणामी इराणहून येणारी आणि इराणला जाणारी अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे प्रलंबित किंवा रद्द करण्यात आली आहेत. यूएईस्थित फ्लायदुबई या विमान कंपनीनं इराणला जाणारी सर्व उड्डाणं रद्द केली आहेत. एतिहाद एअरवेज, कतार एअरवेज, तुर्किश एअरलाइन्स, ऑस्ट्रेलियन एअरलाइन्स तसंच कतार एअरवेजनंही अनेक उड्डाणं रद्द केली आहेत.
महागाई, बेराजगारीच्या प्रश्नावर इराणमध्ये गेले १४ दिवस आंदोलन सुरू आहे. हजारो नागरिक रस्त्यांवर उतरून सरकारविरोधी निदर्शनं करत आहेत. राजधानी तेहरान आणि इराणमधलं दुसऱ्या क्रमांकाचं मोठ शहर मश्शदमध्ये हे आंदोलन मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. तेहरानच्या पश्चिम भागात एका पालिकेच्या इमारतीला आंदोलनकर्त्यांनी आग लावल्याचं वृत्त तेथील माध्यमांनी दिलं आहे. काल रात्री सुमारे ५० बँक इमारती आणि काही शासकीय इमारती पेटवून दिल्याची माहिती महापौर अलिरेझा झकानी यांनी दिली. ३० मशिदींनाही आग लावण्यात आली. या हिंसक आंदोलनात ६५ आंदोलनकर्ते आणि १५ सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाल्याची माहिती इराणच्या मानवाधिकार संस्थांनी दिली आहे. आतापर्यंत सुमारे अडीच हजार आंदोलनकर्त्यांना अटक केल्याची माहिती नॉर्वे स्थित एका मानवाधिकार संघटनेने दिली आहे. जाळपोळ, सरकारविरोधी घोषणांच्या ध्वनिचित्रफीती समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्या आहेत.