महायुतीमध्ये निधी देण्यावरून चढाओढ, शरद पवारांचा आरोप

महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये निधी देण्यावरून चढाओढ लागली आहे, असा आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज केला. बारामती इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. हल्ली कामावर मतं मागितली जात नाहीत, तर पैसे देऊन, निधी देऊ अशी आश्वासनं दिली जातात. ही चांगली गोष्ट नाही. अर्थकारण आणून निवडणुका जिंकायच्या, हाच दृष्टिकोन असेल, तर त्यावर भाष्य न केलेलं बरं, असं पवार म्हणाले. राज्य सरकारनं कर्जवसुलीला एका वर्षाची स्थगिती देण्याचा निर्णय तात्पुरता उपयोगी ठरेल, पण शेतकऱ्यांचं झालेलं आर्थिक नुकसान पाहता त्यातली काही रक्कम सरकारनं द्यायला हवी होती, असं मतही पवार यांनी मांडलं.