राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आणि देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून आदरांजली वाहिली जात आहे. गांधी जयंतीनिमित्त देशभरात तसंच भारतीय दूतावासांमध्येही यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दिल्लीत राजघाट इथल्या महात्माजींच्या समाधीस्थळी सर्व धर्म प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान, काही वेळापुर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राजघाटावर बापूजींच्या समाधीस्थळावर श्रद्धांजली वाहिली. गांधी जयंतीचे औचित्य साधून, आज जागतिक पातळीवर आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस पाळण्यात येणार आहे.