डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

February 26, 2025 8:31 PM | Mahashivaratri

printer

महाशिवरात्रीच्या सणाचा देशभरात सर्वत्र उत्साह

महाशिवरात्रीचा सण आज राज्यात सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. भगवान शंकराच्या एकूण १२ ज्योतिर्लिंगांपैकी पुण्याजवळ भीमाशंकर, नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर, वेरुळचं घृष्णेश्वर, हिंगोली जिल्ह्यातलं औंढा नागनाथ आणि बीड जिल्ह्यातल्या परळी इथलं वैजनाथ अशी ५ ज्योतिर्लिंग राज्यात आहेत. आज महाशिवरात्री उत्सवानिमित्त या सर्व मंदिरांमधे भाविकांची गर्दी झाली आहे.  सर्व मंदिरे आकर्षक रोषणाई आणि फुलांच्या सजावटीने सजली आहेत. राज्यात महाशिवरात्रीनिमित्त भजन, कीर्तन, पूजा, महाअभिषेक असे विविध धार्मिक कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजित केले जात आहेत. अनेक ठिकाणी जत्रा भरल्या आहेत. 

नाशिकच्या त्रंबकेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी राज्यभरातून भाविक दाखल झाले आहेत. आज सकाळी त्र्यंबकेश्वराची महापूजा करण्यात आली. नाशिकच्या इतर शिव मंदिरांमध्ये महाशिवरात्री निमित्तं भाविकांची गर्दी झाली आहे. 

बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ इथल्या प्रभू वैद्यनाथाच्या महाशिवरात्र यात्रा महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. बीड मध्ये विविध शिवालयांमध्ये महाशिवरात्र निमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी आहे. 

मुंबईच्या बाबुलनाथ सह प्रसिद्ध शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी आहे. 

नांदेडमध्ये शिव मंदिरामध्ये भाविकांनी गर्दी केली आहे. पहाटेपासून ठिकठिकाणी अभिषेक, पूजाअर्चना केली जात आहे. 

लातूरचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रेला उत्साहात प्रारंभ झाला. २१ दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला मध्यरात्री दुग्धाभिषेकानं सुरुवात झाली. मध्यरात्री आरतीनंतर भाविकांसाठी दर्शन खुलं करण्यात आलं. 

उत्तराखंडमधल्या केदारनाथ धामचे दरवाजे २ मे रोजी सकाळी ७ वाजता भाविकांसाठी उघडले जातील, असं आज जाहीर करण्यात आलं.