राज्यातल्या अवकाळी पाऊस आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राकडे २९ हजार कोटी रुपयांची मदत मागितली आहे. राज्य सरकारनं आतापर्यंत ४४ हजार कोटी रुपये दिले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली. केंद्राची मदत लवकरच मिळण्याची आशा असून दुसरं पाहणी पथक येत्या आठवड्यात येण्याची शक्यता असल्याचं ते म्हणाले. पुरवमी मागण्यांवरच्या चर्चेला ते उत्तर देत होते. यानंतर सुमारे 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर झाल्या.
राज्यात वित्तीय शिस्त ठेवण्याचा, उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्याचा, राजकोषीय तूट ३ टक्क्यांच्या आत ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे असंही ते म्हणाले. महाराष्ट्रासह केवळ ३ राज्यांना कर्जाचं प्रमाण २० टक्क्यांच्या आत ठेवण्यात यश आल्याची माहिती त्यांनी दिली.