वाहनांच्या ई-चलानच्या यंत्रणेत बदल करणार, लोक अदालतीतून थकीत दंड वसुलीचाही प्रयत्न

वाढती वाहनसंख्या तसंच ई – चलानच्या यंत्रणेत बदल करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अभ्यासगट स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी विधानपरिषदेत ही घोषणा केली. ई चलानची वसुली करण्यासाठी लोक अदालत सारखा उपक्रम राबवण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

 

राज्यात सर्व इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफ करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी  येत्या आठ दिवसात करावी आणि शासन निर्णय जारी केल्यापासून वसूल झालेली टोल रक्कम परत करावी, असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभेत दिले. अशा वाहनांसाठी राज्यभर चार्जिंग स्टेशन वाढवा आणि त्यांच्या क्षमतेत देखील वाढ करा, अशा सूचना अध्यक्षांनी यावेळी दिल्या.

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना २१०० रुपयांचा हप्ता योग्य वेळी देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. लाडकी बहीण योजनेसाठी  २ कोटी ४३ लाख ८२ हजार ९३६ अर्ज विभागाने पात्रतेनुसार ग्राह्य धरले आहेत, अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत दिली. आत्तापर्यंत १ कोटी ७४ लाखांहून अधिक महिलांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे, असंही त्यांनी सांगितलं. राज्यातल्या १२ ते १४ हजार महिलांच्या नावावर पुरुषांची बँक खाती जोडलेली असल्याचं पडताळणीत आढळलं असून अशा प्रकरणांचा सखोल तपास करून कुठलीही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही, याची खात्री केल्याचं तटकरे म्हणाल्या. तसंच ८ हजार शासकीय कर्मचाऱ्यांनी अपात्र असतानाही घेतलेल्या रकमेची वसुली गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून सुरू असून पुढच्या दोन महिन्यांत ती पूर्ण होईल, असंही त्या म्हणाल्या.  दारूची दुकानं स्थलांतरित करण्यासाठी संबंधित इमारतीच्या नोंदणीकृत सोसायटीचा ना हरकत दाखला घेणं अनिवार्य राहील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. 

 

निकृष्ट दर्जाची औषधं विक्री प्रकरणी राज्यातल्या १७६ किरकोळ आणि ३९ घाऊक औषध विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आल्याचं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी आज विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. 

 

दर्जेदार प्रवासी वाहतूक सेवा देण्यासाठी आठ हजार नवीन एस.टी. बसगाड्यांची खरेदी केली जाणार असून पहिल्या टप्यात तीन हजार तर दुसऱ्या टप्प्यात पाच हजार बसगाड्यांची  खरेदी केली  जाईल अशी    माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत दिली. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.