तुकडेबंदी कायद्यातल्या जाचक अटी शिथिल करणाऱ्या विधेयकाला विधानसभेची मंजुरी

तुकडेबंदी कायद्यातल्या जाचक अटी शिथिल करणारं विधेयक आज विधानसभेत मंजूर झालं. यामुळं सर्व जमीन धारकांची नावं सात बाऱ्यावर येतील आणि लहान भूखंडाची खरेदी विक्री सुलभ होईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. 

 

या नवीन विधेयकामुळे आता विकास आराखडा किंवा प्रादेशिक आराखडा मंजूर असलेल्या क्षेत्रात वेगळ्या ‘एनए’ परवानगीची गरज भासणार नाही. त्याऐवजी ‘एक वेळचे अधिमूल्य’  भरून ही प्रक्रिया पूर्ण करता येईल, असं या विधेयकात स्पष्ट करण्यात आले आहे.

 

सार्वजनिक विश्वस्त कायद्यात बदल करणारं विधेयकही आज विधानसभेनं मंजूर केलं. भीक मागण्यास प्रतिबंधक करणारं विधेयक  आणि ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर झालं. याशिवाय नगर परिषद, नगर पंचायती, औद्योगिक नगरी सुधारणा विधेयकालाही विधान परिषदेनं मंजुरी दिली. 

 

राज्यात इतर मागास प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी ६५ वसतीगृहं असून इतर जिल्ह्यांमधे वसतीगृहासाठी जागा संपादित केली जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली. राज्यातल्या शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात पान, तंबाखू, तसंच अंमली पदार्थ मिळण्याच्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून, कायद्यात बदल करून अशा प्रकरणांमध्ये मकोका लावण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं. पान टपऱ्या उध्वस्त करण्याच्या सूचना सर्व महापालिका, नगरपालिकांना देण्यात आल्या असल्याची माहिती, गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली.

 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा बसविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. लोकसभेतील एका लेखी उत्तरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या प्रस्ताव नाकारल्याची माहिती दिली गेली होती त्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. .या स्थानकासाठी नवीन आराखडा मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. त्यानंतर काम सुरु करणार आणि पुतळा उभारणार अशी ग्वाही त्यांनी दिली.

 

बिबट्यांचा वावर असलेल्या परिसरातल्या शाळा, गस्तीमध्ये स्थानिकांचा सहभाग अशा प्रश्नांवर  लोकप्रतिनिधी, वन आणि महसूल विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन सर्व प्रश्न सोडविण्याचं आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी लक्षवेधीच्या उत्तरावर दिली. 

 

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे माझा दवाखाना ही योजना अधिक व्यापकपणे राबवण्यात येईल अशी माहिती सार्वजनिक आरोग्य आणि  कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत दिली. या योजनेतून ६०४ दवाखाने आणि १ हजार ६४३  आरोग्य केंद्रे सुरु झाली आहेत अशी माहिती त्यांनी दिली. राज्यातल्या महिला आणि बालसुधारगृहांमधली सुरक्षा रक्षकांची रिक्त पदं महिनाभरात भरण्याचं आश्वासन महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानपरिषदेत दिलं. जलसंधारण प्रकल्पांमधील अनियमितता आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणांच्या चौकशीसाठी SIT स्थापन करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.