काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कृषी क्षेत्रातल्या निधीचा अपव्यय, राज्यातली ढासळलेली कायदा-सुव्यवस्थेची स्थिती, वाढती गुन्हेगारी इत्यादी मुद्द्यांवरून सरकारवर निशाणा साधला. हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर ते आज विधानसभेत बोलत होते. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना सरकारनं जाहीर केलेलं ३१ हजार कोटी रुपयांचं पॅकेज कागदावरच राहिलं. कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १८ हजार ५०० रुपये द्यायची घोषणा केली, पण प्रत्यक्षात त्यांना फक्त ८ हजार ५०० रुपये मिळाले, असं सांगून वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरलं.
शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या वाढलेल्या किंमती, शेतमालाला हमीभाव न मिळणं यावरून वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली. राज्यातली वाढती गुन्हेगारी, अंमली पदार्थांचा वाढता विळखा, पुण्याच्या आदिवासी वसतीगृहात मुलींची गर्भधारणा चाचणी प्रकरण, मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण इत्यादी मुद्देही त्यांनी उपस्थित केले. नागपुरात अधिवेशन होत असताना विदर्भातली सिंचनाची स्थिती तातडीनं सुधारावी, धानाला प्रति क्विंटल १ हजार रुपये आणि सोयाबीनला प्रति क्विंटल २ हजार रुपये बोनस द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. विदर्भ वैधानिक मंडळाला त्वरित मान्यता द्यावी, अशी मागणीही त्यांनी लावून धरली.