विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरू झालं. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारनं आज ७५ हजार २८६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या.
शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त दोन्ही सभागृहात आज वंदे मातरमचं सामूहिक गायन झालं. त्यानंतर तालिका अध्यक्षांची नियुक्ती झाली. काँग्रेस नेते नाना पटोले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव यांनी हे अधिवेशन वाढवून देण्याची मागणी अध्यक्षांकडे केली. विधिमंडळाचं कामकाज गुंडाळण्याचा प्रयत्न करण्यात येत असून कामकाज घाईघाईनं उरकलं जात आहे, असा आरोप पटोले यांनी केला. यावर विधिमंडळाचं अधिवेशन आणि कामकाज यावर कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सर्वसंमतीनं निर्णय होतो, त्यामुळे आता त्यावर वेगळी चर्चा होणार नाही, असं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. तर आचारसंहितेमुळे हे अधिवेशन अल्पकालीन असल्याचं स्पष्ट करून हा कालावधी पुढील अधिवेशनात भरून काढू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
या अधिवेशनातही सरकारनं पुरवणी मागण्या मांडल्या. ७५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या या पुरवणी मागण्यांपैकी १५ हजार ६४८ कोटी रुपये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी राखीव आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी ६ हजार कोटींहून अधिक तर मनरेगासाठी साडे ३ हजार कोटी रुपयांची तरतूद यात आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी ३ हजार कोटी रुपये तर एसटी महामंडळासाठी २ हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत. आयुष्मान भारतासाठी सव्वा ३ हजार कोटी, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी २ हजार २०० कोटी रुपयांची तरतूद सरकारनं यात केली आहे.
त्यानंतर दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहून दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.