Maharashtra: नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान

राज्यातल्या २२२ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार आज रात्री १० वाजता संपेल. आज दिवसभर विविध पक्षांच्या नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. या मतदानासाठी यंत्रणा सज्ज आहे. त्यासाठी कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रांवर पोहोचले आहेत. या निवडणुकीचं मतदान उद्या, तर मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे. या मतदानासाठी उद्या, २ डिसेंबर रोजी संबंधित ठिकाणी सार्वजनिक सुट्टी जाहीर झाली आहे. 

 

दरम्यान, राज्यात एकंदर २४ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी आणि १५४ सदस्यपदांसाठी येत्या २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. न्यायालयात गेलेल्या प्रकरणांमध्ये अपील कालावधीनंतरच्या टप्प्यांसाठी सुधारित कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज मागे घ्यायची मुदत १० डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. अंतिम उमेदवारांची यादी आणि निवडणूक चिन्हांचं वाटप ११ डिसेंबरला होईल. २० डिसेंबर रोजी मतदान, तर २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यात अंबरनाथ, कोपरगाव, बारामती, महाबळेश्वर, यवतमाळ, वाशिम यासह अनेक ठिकाणांचा समावेश आहे. 

 

(नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर, ओझर आणि चांदवड नगरपरिषदांच्या निवडणुका पुढे ढकलायचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे. सांगली जिल्ह्यातल्या शिराळा नगरपंचायत प्रभाग ४च्या सदस्यपदाची निवडणूक, निवडणूक आयोगानं स्थगित केली आहे. 

 

सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वर आणि फलटण पालिकेची निवडणूक, तसंच मलकापूर पालिकेतल्या २ ठिकाणी न्यायालयाच्या निर्णयानुसार २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

 

सोलापूर जिल्ह्यात अनगर आणि मंगळवेढ्यासह जिल्ह्यातल्या काही प्रभागांमधल्या निवडणुकाही लांबणीवर पडल्या आहेत.

 

अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यातल्या प्रभाग ४ ची निवडणूक उमेदवाराचा मृत्यू झाल्यानं स्थगित करण्यात आली आहे.

 

पालघर नगरपरिषदेतल्या प्रभाग ‘१- ब’ आणि वाडा नगरपंचायतीतल्या प्रभाग १२ची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. 

 

गडचिरोलीतल्या ३, तर आरमोरीत १, अशा एकंदर चार प्रभागांमधल्या निवडणुकांना आयोगानं स्थगिती दिली आहे.

 

हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत नगरपरिषदेची, तर हिंगोली नगरपरिषदेतल्या दोन प्रभागांच्या निवडणुकाही स्थगित झाल्या आहेत.

 

तर, यासह इतरही काही ठिकाणी निवडणूक कार्यक्रम स्थगित करायच्या राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वच राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. निवडणुका स्थगित करायचा राज्य निवडणूक आयोगाचा हा निर्णय चुकीचा आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं केलं. हा निर्णय इतर उमेदवारांवर अन्याय करणारा असून तो कायद्याला धरून नाही, असं ते म्हणाले.

 

निवडणूक प्रक्रिया स्थगित न करता सुरू ठेवाव्यात, अशी मागणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राज्य निवडणूक आयुक्तांकडे पत्राद्वारे केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हा निर्णय चुकीचा असल्याचं मत व्यक्त केलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही या निर्णयावर टीका केली. मतदान एका दिवसावर आलेलं असताना २० नगरपालिका आणि काही प्रभागांमधल्या निवडणुका पुढं ढकलायचा निर्णय आश्चर्यकारक आणि अनाकलनीय असून आयोगाचा भोंगळ कारभार सुरू आहे, असा आरोप सपकाळ यांनी केला.)

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.