राज्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस

राज्यात आज अनेक ठिकाणी गारपिटीसह अवकाळी पावसानं हजेरी लावली. 

 

जालना शहरासह जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आणि काही भागात गारा पडल्या. त्यामुळे आंबा फळपिकासह कांदा बियाणं, उन्हाळी बाजरी, मका आणि इतर पिकांचं नुकसान झालं. मात्र नागरीकांना उकाड्यातून काहीसा दिलासा मिळाला. 

 

नाशिकमध्ये  मनमाड शहराला  गारपिटीसह अवकाळी पावसानं  झोडपून काढलं. 

 

अहिल्यानगर जिल्ह्यातही आज वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला.   त्यामुळे फळबागांचं आणि काढणीला आलेल्या कांद्याचं  नुकसान झालं. 

 

वाशीम मध्येही आज रिसोड आणि वाशिम तालुक्यात गारपिटीसह अवकाळी पावसाच्या सरी आल्या. 

 

परभणी जिल्ह्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह पाऊस झाला तर तुरळक ठिकाणी गारपीट  झाली. वाऱ्याचा वेग जास्त असल्यानं  काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. तर वाळत  घातलेली हळद झाकण्यासाठी  तारांबळ उडाली. 

 

बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात तब्बल दोन तास अवकाळी पाऊस आणि    मोठी गारपीट झाली.

 

हिंगोली जिल्ह्यात औंढा, कळमनरी, वसमत, सेनगाव तालुक्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला.

 

बुलढाणा जिल्ह्यात खामगाव, शेगावसह काही भागात  पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यानं काही प्रमाणात गारवा निर्माण झाला.