महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक विधानपरिषदेनं आज विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर त्यांच्या अनुपस्थितीत आवाजी मतदानानं मंजूर केलं. या विधेयकाला काल विधानसभेची मंजुरी मिळाली होती. आज गृहराज्यमंत्री योगेश नाईक यांनी हे विधेयक विधानपरिषदेत मांडलं. हा कायदा नागरिकांच्या संरक्षणासाठी आणला असल्याचं सांगून यामागची सरकारची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी या विधेयकाला विरोध केला. नक्षलवाद, दहशतवादाला डावी किंवा उजवी विचारसरणी नसते. हा कायदा उजव्या अतिरेक्यांना सोडणार का? यासंदर्भात आधीच अनेक कायदे असताना नवा कायदा आणायची गरज काय? एखाद्या संघटनेला लक्ष्य करण्याचा यामागचा उद्देश आहे का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. अशा संघटनांना बेकायदेशीर ठरवण्यासाठीचं सल्लागार मंडळ म्हणजे सरकारच्या हातातलं बाहुलं आहे, असा आरोप त्यांनी केला.
या विधेयकाबाबत राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करायची गरज असल्याचं मत भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी मांडलं. काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांनी ‘कडवी डावी विचारसरणी’ या शब्दाला आक्षेप घेतला. या विधेयकाबाबत आलेले आक्षेप, सूचनांची सार्वजनिक सुनावणी का घेतली नाही, असा प्रश्नही त्यांनी विचारला आणि काँग्रेस पक्षाचा विधेयकाला विरोध असल्याचं सांगितलं.
भाजपाचे प्रसाद लाड यांनी या विधेयकाला पाठिंबा देताना शिवसेनेविषयी केलेलं वक्तव्यावर आक्षेप घेत विरोधकांनी सभागृहात गदारोळ आणि नंतर सभात्याग केला. त्यानंतर विधान परिषदेचं कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर विरोधकांच्या अनुपस्थितीत महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलं.