महाराष्ट्रातील रस्त्यांच्या कामासाठी दीड लाख कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. हे काम पुढल्या तीन महिन्यात सुरू होईल, असं ते म्हणाले. विधानपरिषदेच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते आज नागपुरात विधानभवन परिसरात गेले होते, त्यावेळी त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला.
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ १६ हजार ३१८ कोटी रुपयांचा पुणे ते संभाजीनगर महामार्ग बांधणार असून यासाठीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली. या मार्गामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगरमधलं अंतर दोन तासांनी तसंच नागपूर ते छत्रपती संभाजीनगरमधलं अंतर अडीच तासांनी कमी होईल, असं गडकरी म्हणाले. त्याचप्रमाणे सध्याच्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला समांतर असणाऱ्या १५ हजार कोटी रुपये खर्चाच्या द्रुतगती मार्गामुळे दोन्ही शहरातलं अंतर दीड तासांनी कमी होईल, असंही गडकरी यांनी सांगितलं.
४ हजार २०७ कोटी रुपयांच्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाचं भूमिपूजन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर केलं जाईल, पुणे विभागातल्या ५० हजार कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली असून पुढल्या तीन महिन्यात हे कामही सुरू होईल, असं गडकरी यांनी सांगितलं.