महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आज सेवानिवृत्त झाल्या. पोलीस दलात साडे ३७ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या शुक्ला यांना मुंबईत भोईवाडा इथल्या पोलीस मैदानात मानवंदना देण्यात आली. त्यानंतर शुक्ला यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. त्यांच्या यशस्वी कारकिर्दीबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
राज्याचे नवनियुक्त पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी आज रश्मी शुक्ला यांच्याकडून आपल्या पदाचा कार्यभार हाती घेतला. तत्पूर्वी त्यांनीही मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन करत मुख्यमंत्र्यांनी त्यांना कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.