राज्यात अनेक भागांत जोरदार पाऊस सुरु असून, अनेक धरणांमध्ये पाणी पातळीत वाढ होत आहे. मुंबई शहराची तहान भागवणारं वैतरणा धरण ९५ टक्के भरलं असून, धरणातून विसर्ग सुरू आहे.
पालघर, कोल्हापूर, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये पाऊस होत असून त्यादृष्टीनं प्रशासन सतर्क आहे. पालघर जिल्ह्यात संततधार पावसामुळे धामणी धरणाचे पाच दरवाजे उघडले असून, कवडास धरणातूनही विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातल्या शाळांना आज सुटी जाहीर करण्यात आली असून, नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातलं राधानगरी धरण ७७ टक्के भरलं आहे. वेदगंगा आणि दूधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, शेतांमध्ये पाणी शिरलं आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरूच असल्यानं गंगापूर धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर इथला दुगारवाडी धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या दहा ते पंधरा पर्यटकांना याच परिसरात पावसामुळे अडकून राहावं लागलं; मात्र जिल्हा प्रशासनाने त्यांची सुखरुप सुटका केली. त्र्यंबकेश्वर तालुक्यात तळवाडे इथं तलावात बुडून एका युवकाचा मृत्यू झाला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणात पाणीसाठा ५२ टक्क्यांवर गेला आहे. धरणात सध्या २४ हजार १९२ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक सुरु आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातल्या निळवंडे धरणातून आज सहा हजार ५७० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी प्रवरा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पावसाचं प्रमाण लक्षात घेता पुढील काही तासांत विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढण्याची शक्यता असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे प्रवरा नदीपात्रात पाणी – पातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
धुळे जिल्ह्यात पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे तसंच अक्कलपाडा प्रकल्पाच्या वर पांझरा, मालनगाव आणि जामखेडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने अक्कलपाडा धरणामध्ये पाण्याचा येवा वाढत आहे. त्या अनुषंगाने पांझरा नदी वरच्या निम्न पांझरा मध्यम प्रकल्पातून पाच हजार २३० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे.
पुढचे दोन दिवस राज्यभरात पावसाची संततधार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.