गेले काही दिवस जोरदार हजेरी लावून आज पावसानं राज्यात काहिशी विश्रांती घेतली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस ओसरला आहे. सर्व नद्यांची पाणीपातळीही कमी झाली आहे. आज दुपारी १२ वाजताच्या स्थितीनुसार, जिल्ह्यातल्या सर्व नद्यांची पाणीपातळी इशारा पातळीच्या खाली आली आहे.
मात्र, पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते खचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबई- गोवा महामार्गावर खेड तालुक्यात वळंजवडी इथं १०० मीटर परिसरात भेगा पडल्यानं या वाहतूक एकेरी मार्गावरून सुरू आहे.
सातारा जिल्ह्यात पाटण-चिपळूण महामार्गावरही रस्ता पाण्याखाली जाऊन खचल्यानं वाहतूक पर्यायी मार्गावर वळवण्यात आली आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यात पाण्यात बुडून एकाचा आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर झाड पडून तीन व्यक्ती जखमी, स्लॅब पडून दोन व्यक्ती जखमी आणि भिंत पडून दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. तसंच यवतमाळ जिल्ह्यात पाण्यात बुडून एक व्यक्तीचा मृत्यू झाला असून धुळे जिल्ह्यात भिंत पडून चार प्राण्यांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली आहे.