धाराशिव जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसानं जिल्ह्यात पुन्हा जोरदार हजेरी लावली असून भूम वाशी आणि कळंब तालुका परिसरात जोरदार पाऊस बरसला. नद्यांचं पाणी वाढल्यानं अनेक गावांकडे जाणारे रस्ते बंद आहेत. सध्या पावसाचा जोर ओसरला असून वातावरण ढगाळ आहे. मांजरा धरणातून पंधरा हजार क्युसेक वेगानं विसर्ग देखील सुरू करण्यात आला आहे. सापनाई इथं आज मुसळधार पाऊस झाल्यानं ओढे-नाले भरुन वाहू लागले. शेतात पाणी घुसल्यानं जमीन खरडून गेली.
भंडारा जिल्ह्यात आठ दिवसाच्या विश्रांती नंतर आज वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. धान पीक काही दिवसात कापणीला येणार आहे. त्यामुळे या पावसाचा फटका हलक्या वाणाच्या धानाला बसणार आहे.
लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी आज पुन्हा पावसानं हजेरी लावली. त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं. काही भागात जमिनी वाहून गेल्या आहेत. मुरुड ते वाठवडा, मुरुड ते पाडोळी मार्गे धाराशिव जिल्ह्यात कळंबच्या दिशेनं जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. मुरुडा नदी ओसंडून वाहू लागली आहे