September 29, 2025 8:28 PM

printer

महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत ११७ टक्के पाऊस, दिवाळीपूर्वी मदत देण्याचं सरकारचं आश्वासन

राज्यात सरासरीच्या तुलनेत ११७ टक्के पाऊस झाला आहे. कोल्हापुरातला ८५ टक्के आणि अमरावती, रायगड तसंच नाशिकमधला सुमारे ९५ टक्के वगळता इतर सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक १७० टक्क्यांहून अधिक पाऊस सांगलीत झाला. जळगावमध्ये सरासरीच्या १४१ टक्के पावसाची नोंद झाली आहे. 

 

अतिवृष्टीमुळं राज्यातले ४१ हजारांपेक्षा अधिक नागरिक स्थलांतरित झाले आहेत, अशी माहिती राज्य सरकारनं दिली आहे. सर्वाधिक १३ हजारांहून अधिक नागरिक सोलापूरात स्थलांतरित झाले आहेत. तर जालन्यात साडे ८ हजार, छत्रपती संभाजीनगरमध्ये ८ हजारांहून अधिक आणि धाराशिवमध्ये सुमारे ४ हजार नागरिक स्थलांतरित झाले आहेत. 

 

राज्यात अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीचे पंचनामे या आठवडाअखेर पूर्ण होतील. दिवाळीपूर्वी सरकार शेतकऱ्यांना मदत करेल असं आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं. अतिवृष्टीमुुळे राज्यात झालेलं नुकसान ही गेल्या ५० वर्षातील सर्वात मोठी आपत्ती असल्याचं ते म्हणाले.

 

पंचनामे काटेकोरपणे व्हावेत यासाठी महसूल विभागाला आदेश देण्यात आले आहेत. ई – पंचनामे केले जात आहेत. प्रत्येक पंचनामा ग्रामसभेत दाखवणं अनिवार्य केलं असून, अधिकारी थेट शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत आहेत, असं बावनकुळे यांनी सांगितलं.