डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 28, 2025 3:11 PM | Maharashtra Rain

printer

महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, मुख्यमंत्र्यांनी घेतला पूरग्रस्त परिस्थितीचा आढावा

राज्यात अनेक ठिकाणी आजही मुसळधार पाऊस होत असून अनेक ठिकाणी पूरस्थिती कायम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांसह सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क करुन पावसाच्या, मदतकार्याच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.  

 

पावसामुळं धरणांचे विसर्ग वाढविले जात असताना नागरिकांना आधीच सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यावर लक्ष केंद्रीत करावं आणि सर्व अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष फिल्डवर राहून काम करावं, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. 

 

मुंबई शहरासह उपनगरात काही सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असल्यानं  अशा ठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्या विभागानं  उपसा पंप २४ तास कार्यान्वित ठेवले आहेत.  रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत आहे. 

 

ठाणे आणि पालघर जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह, ढगांच्या गडगडाट आणि विजांसह पाऊस पडत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सरासरी ५९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासह मराठवाड्याच्या काही भागात मुसळधार होत असून कन्नड तालुक्यातल्या  शिवना नदीला पूर आला आहे.

 

अहिल्या नगर  जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून  जिल्ह्यातल्या विविध  प्रकल्पांमधून पाण्याचा  मोठा विसर्ग सुरू आहे. बीड शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळं शहरातल्या  लेंडी रोड आणि मोमीनपुरा भागातल्या  घरांमध्ये पाणी  घुसल्यानं  संसार उपयोगी वस्तूंचं  नुकसान झालं. लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यातल्या  बेळ सांगवी गावातल्या  अनेक  नागरिकांना  वाढवणा इथं  स्थलांतरित करण्यात आलं आहे. नांदेडमधे पावसानं काहीशी विश्रांती घेतली असली तरी विष्णुपुरी प्रकल्पात अद्याप पाण्याची आवक सुरु आहे. गोदावरी नदीप्रवाहाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या कयाधू नदीला महापूर आला आहे. कळमनुरी तालुक्यातल्या कोंढुर गावामध्ये पाणी शिरल्यानं जन जीवन विस्कळीत झालं  आहे. धाराशिव जिल्ह्यात  मुसळधार पावसाचा जिल्हापरिषद शाळांना मोठा फटका बसला. जिल्ह्यातल्या ७८  शाळांमधल्या १२५  वर्गखोल्यांची पडझड झाली.

 

नाशिक शहरात रात्री मुसळधार पाऊस  होत आहे. तिवंधा चौक इथला एक वाडा कोसळला, तर बागलाण तालुक्यात एका घराची भिंत कोसळून एक वृध्द महिलेचा मृत्यू झाला. गंगापूरसह अनेक धरणातून विसर्ग वाढवला आहे. त्र्यंबकेश्वर, येवला, मालेगाव या तालुक्यांमध्ये जोरदार पावसानं  हजेरी लावली. 

 

धुळे जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. धुळे, शिंदखेडा, साक्री, शिरपूर तालुक्यातल्या अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे पांझरा, बोरी, अरुणावती नदीला पुन्हा एकदा पूर आला आहे. अक्कलपाडा धरणातून १० हजार क्यूसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

 

अकोला जिल्ह्यासह अकोला शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये गुडघाभर पाणी साचले. परिणामी वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागते.