राज्यात अनेक ठिकाणी अद्याप पावसाचा जोर आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण, सिल्लोड, गंगापूर, सोयगाव, खुलताबाद तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यातल्या दहा मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. सिल्लोड तालुक्यातल्या घटनांद्रा इथल्या नदी नाल्यांना पूर आला आहे. ढगफुटी सदृश पावसामुळे अनेक गावांचा संपर्क देखील तुटला आहे.
कन्नड तालुक्यात पिशोर इथं काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकी नदीला पूर आला आहे. आसपासच्या परिसरातल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलं असून, मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.